Monday, February 23, 2009

||ह्रुदयी अजूनी माझ्या, तुझा ओलाच घाव आहे ||

.

येथे माणूसकी विकली जाते, प्रत्येकाचा ठरलेलाच भाव आहे
एकाच वस्तीतूनी, प्रत्येकाचा वेगळाच गाव आहे॥१॥

घेऊनी तिचे नाव, आजन्म मुका जाहलो मी
म्हने ओठी तिच्या आता, दुसरेच नाव आहे॥२॥

नको देऊस जखम नवी, मज सोसवे न आता
ह्रुदयी अजूनी माझ्या, तुझा ओलाच घाव आहे॥३॥

एकदाच येऊनी, सये पाहून जा
तुझवीण संसाराचा, अर्धाच डाव आहे॥४॥

राजाचा रंक जाहलो, भुलली दुनिया मलाही
वेडया मनास तरीही, तव प्रितीचीच हाव आहे॥५॥

.

!!!!! शेवटचे गीत !!!!!

.

जिवनावरचे पांघरूण
दूर सारायचे होते
डोळे भरून आले
तरी थोडे हसायचे होते ॥

घेण्या मोकळा श्वास
पसरविले होते हात
छाटताना सजनी एकदा
तुझ्या गळा भेटु द्यायचे होते ॥

तुझ्या प्रत्येक वाटेवरचे
मी वेचिले होते काटे
तोल जात होता माझा
पडताना,तु सावरायचे होते ॥

मी निर्मिले होते सजनी
आपल्या स्वप्नातील घरटे
तु ओलांडताना उंबरठा
क्षणभर,स्वतःला विचारायचे होते ॥

तु नव्हतीस माझ्या
अन मी तुझ्या बंधनात
बंधनातीत नाते तरीही
तुज तोडायचे होते ॥

मागीतली न होती मी
म्रृत्यू नंतर ही तुझी साथ
अखेरच्या क्षणी मात्र
तु जवळ असायचे होते ॥

मजसी न कोणती आशा
न हा उद्योग उत्तरांसाठी
मनातील दुःख माझे
शब्दात मांडायचे होते ॥

.

अवकाश बराच आहे !!!

.

डोळ्यात वाट जागी,आभास उगाच आहे
तु येण्यास अजूनी, अवकाश बराच आहे !!

नभ दाटले असे का, झाली आभाळी घालमेल
येण्या मोसम पावसाचा, अवकाश बराच आहे !!

झाकू नकोस सजनी, तुझ्या चंदेरी मुखास
अजुनी पहाट होण्या, अवकाश बराच आहे !!

आहे उभा तसाच, दारात मृत्यु माझ्या
तुझि मिठी सैल होण्या, अवकाश बराच आहे !!

खेळ जिवनाचा मांडलेला, आव्हान तसेच जागे
तुझ्या पराजयास 'नितिज', अवकाश बराच आहे !!


.

||मिलन||

आभाळात दाटलेले ढग, बस मधुन दिसनारे डोंगर अन त्या डोंगरा जवळून जाणारे ढग जणू काही धरणी बरोबर मिलनास आतुर आहेत अस वाटत अन
मग मधेच पावसाची एक सर. हे सगळ बस मधून पाहिल ते मागच्या शुक्रवारी कोल्हपुरहून पूण्याला जाताना. त्या प्रवासात सुचलेली ही कविता.......


आभाळी नभ दाटलेले
खाली वाढे धरणीची प्यास
दोघ मिलनाला आतुर
सोसवेना विरह दोघास॥१॥

वारा भारीच खटयाळ
नभा आणी धरणी जवळ
क्षणी पालटे बदमाश
पुन्हा नेइ दूर दूर॥२॥

सुर्य राजा कसा चोर
गमंत पाहि वरून
धरणीची घालमेल
पाहि नभाच्या आडून॥३॥

दोघांचे मिलन ठरलेले
एक नशिब दोघांचे
धो धो बरसे नभ
काही चालेना कूणाचे॥४॥

रीता परी समाधानी
झाला नभ बरसून
तॄप्त झाली धरणी वेडी
जलरूपी प्रेम पिऊन॥५॥

नभा म्हणे प्रेमबाला
पून्हा कधि रे मिलन
दोन क्षणांचा विरह राणी
वाट पहा हिरवा शालू लेऊन॥६॥

Tuesday, October 21, 2008

पावसा, सांग कस रे जमत तुला... अस कुणाला छळण?


पावसा, तुझ पून्हा परत येणं
येताना, आठवणींचा पाऊस सोबत आणणं..
माझ्या सुस्त,अचल ह्रृदयाला
पून्हा फिरून घायाळ करन..
सांग कस रे जमत तुला... अस कुणाला छळण?

पावसा, काय मिळवतोस तरी काय तु
माझ्या शांत, निश्चल मनाला असंतुलित करून..
पून्हा पून्हा येऊन असं माझ्या
भोळ्या मनाला तिळ तिळ जाळण
सांग कस रे जमत तुला... अस कुणाला छळण?

पावसा, तुला आठवत असेल, तो तूच
आम्हाला भेटवणारा...हो तूच...
तूच होतास मिलनाच निमित्त बनून आलेला...
तेव्हा वाटलं, प्रेमाच्या रंगात तुही भिजलास आमच्या सोबत
किती सहज होत तुला आम्हाला प्रेम वेड बनवणं..
सांग कस रे जमत तुला... अस कुणाला छळण?

पण पावसा, तोही तूच होतास..
सतत बरसून, आमच्या भांडणात तेल ओतलस.. पाण्याच्या जागी..
तिला आवडायच भिजायला अन मला नाही... काय ते कारण...
बस... तुझ्यामूळेच दुरावली ति.. माझ्यावर रूसुन...
छे कसल हे जगणं...
सांग कस रे जमत तुला... अस कुणाला छळण?

पावसा, आता एकटाच भिजतो तिच्या विना, तु बघतोचस...
तुझे थंड थेंब, अंगाची लाही करून जातात.. तरीही भिजतो
असंख्य सुयांसारखे टोचुन घेऊन तुझे अगणित थेंब...
तुझे असूनही, तुला मोजता येणार नाहीत इतके...
कधीतरी बघ स्वतःहाचे थेंब अंगावर घेऊन..
कोसळण्याहून कठीण असत रे झेलणं..
सांग कस रे जमत तुला... अस कुणाला छळण?

पावसा, तु तर असतोस चिरतरूण प्रत्येक वेळी
तुला वृद्ध व्हावच लागत नाही, सृष्टीत तूच तारूण्य आणतोस..
पण मि.. मि म्हातारा होत असतो तुझ्या प्रत्येक थेंबागणिक..
झिजताना कस वाटत?.. जरा बघ माझ्यासारखं झिजुन ..
म्हणजे कळेल तुला झिजण..
सांग कस रे जमत तुला... अस कुणाला छळण?

तरी सुद्धा पावसा तु का आवडावास मला
प्रत्येक वेळी जखमांवर जखम देणारा..
अन पून्हा त्यावर मलम लावणारा... तुझ रूपच कळत नाही...
वाटलच तर, बघ स्वतःशीच एकदा अस खेळ खेळून...
बनून कुणाच्या तरी हातच खेळणं....
खरच मला सांग रे...कस जमत तुला... अस कुणाला छळण? खरच्....

अधुरी प्रित....

ओघळले शब्दच सारे
मज रीति ओंजळ राहिली
तव प्रितीही तशीच सजनी
अधुरीच कहाणी राहिली ॥१॥

दोन श्वासाच्या अंतरातही
तव आठवण जागी मनी
दिस मावळतीला गेला
तव डोळ्यात नाही पाणी ॥२॥

तुझ्या हरेक श्रृंगाराला
मज रसिकाने दिली दाद
जैसे लुटिले तु सर्वा
ठेविला ना माझाही अपवाद ॥३॥

तुझा न तो,मीच अपराधी
जाणूनी,तव प्रेमात गुंतलो
उरले न सर्वस्व काही हाती
जागेपणी मी, मृत्यूस जिंकलो ॥४॥

॥ तहान.....॥


मेघ दाटले अंबरी, ऊरी तुझा ध्यास
मेघातून येती सरी, जशी तुझ्या आठवणींची बरसात॥

भिजली माती, गंध पसरला सारा
तुझ्या आठवणी मोराचा फ़ुलला पिसारा ॥

पाणी वाहत चालले, धरुनी या वाट
तुझ्या नावाचा जप, जसे करीती माझे ओठ ॥

गार वारयाचा स्पर्श सुखावतो शरीरा
तुझा रेशमी स्पर्शाने अंगी रोमांच स्फ़ुरला ॥

तृप्त झाली धरती, बरसुन तृप्त झाले आसमान
सखे तुझ्या मिलनाशिवाय कशी शमेल माझी तहान ॥